पुणे- भारतात देखील देहविक्री व्यवसायाला ‘प्रोफेशन’ म्हणून मान्यता द्या अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केली आहे. पुण्यात आज शनिवारी बुधवार पेठेतील महिलांसाठी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिर व मुलींसाठी सुकन्या कार्डचे वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
अमृता फडणवीस म्हणाल्या, “मी सरकारला असंच सांगेन की जसा इतर व्यवसायांना सन्मान असतो, त्याप्रमाणे देहविक्री व्यवसायाला देखील आदर मिळाला पाहिजे. त्याला एक व्यवसाय म्हणून स्विकारलं पाहिजे. जर्मनीसारख्या देशांमध्ये देहविक्री व्यवसाय करणाऱ्यांचं आदरणीय स्थान आहे. देहविक्री व्यवसाय करणारे या देशांमध्ये कर देखील भरतात. तेच स्थान आपण सर्वजण एकत्र आलो तर भारतात देखील मिळू शकतं. मी या निर्णयाच्या पाठीशी आहे.”
देहविक्री व्यवसायातील महिलांना मार्गदर्शन करताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे कितीही घाई असेल तर देहविक्री व्यवसायातील महिलांनी आपली वैद्यकीय तपासणी करावी. तुम्ही ज्या व्यवसायात आहात त्यात काही आजार होण्याचा धोका असतो, तो धोका ओळखा. तसेच नियमितपणे आपली तपासणी करून घ्या. त्यासाठी तुमच्यामागे भारतीय जनता पक्ष उभा आहे”
अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या, “आपल्या मुलींना शिकवा. आपल्या मुलांसाठी बचत करा. त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. वृद्धापकाळात वृद्धाश्रमाची गरज असते. त्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करू. मात्र, तुम्ही देखील आपल्या मुलांसाठी बचत करायला विसरू नका”