पुणे – महाविकास आघाडीचा प्रयोग बाळासाहेब ठाकरे यांना आवडला असता. जेंव्हा राजकीय क्रायसिस निर्माण होतो, त्यावेळेला बाळासाहेब असते तर त्यांनी काय केले असते हा विचार डोक्यात येतो. आणि जो क्रायसिस निर्माण झाला आहे, त्याचे उत्तर सापडते. अशा शब्दात शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निर्मितीचे गुपित उघड केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र कनेक्ट कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत,
यांची मुलाखत पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी आज (शनिवार) पुण्यात घेतली. त्यावेळी शरद पवार बोलत होते. या कार्यक्रमात संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला तर शरद पवार यांनी आपल्या स्मरणशक्तीचे गुपित उघड केले. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते सचिन सावंत, कन्हैया कुमार उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, ” मला जेव्हा ईडीची नोटीस आली तेव्हा मी म्हटलं की मीच येतो. मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं की आपल्याला आज सकाळी ईडीच्या ऑफिसमध्ये जायचं आहे. मग ईडीचे अधिकारी हात जोडत आले की तुम्ही येऊ नका. त्यासाठी आपले नाणे खणखणीत हवं. असे मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले.
शरद पवार यांच्या स्मरणशक्तीबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ” मी यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्याकडून हे शिकलो. त्यांचे राजकारण आणि समाजकारण यशस्वी होण्यास ज्या गोष्टी कारणीभूत आहेत. या दोन लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी ५० वर्षांपूर्वीचा जोडीदार जरी त्यांना भेटायला आला तरी ते त्याला पहिल्या नावाने हाक मारायचे.”
“एकदा माझ्या मतदारसंघातील एक महिला मुख्यमंत्री असताना तिचे काम घेऊन मुंबईत आली. मी त्या महिलेला म्हटलं कुसुम काय काम काढलं ? मी नावाने हाक मारल्यावर ती तिचे कामच विसरुन गेली आणि गावाकडे सगळ्यांना सांगितले की मला साहेबांनी नावाने ओळखले. आधी माझ्या मतदारसंघातील पन्नास टक्के लोकांना मी नावाने ओळखायचो. आता तसे नाही. आता त्याने आजोबांचे नाव सांगितलं की कळतं हा कोणाचा आहे”
काश्मीर फाइल्समध्ये खोटी परिस्थिती दाखवली
द काश्मीर फाइल्सवर शरद पवार यांनी भाष्य केले. शरद पवार म्हणाले, ” हा सिनेमा जनमानसावर वेगळा परिणाम करण्याच्या उद्देशाने तयार केला. यामध्ये काश्मीरमधील खोटी परिस्थिती दाखवली. भाजपने काश्मीरमधील पंडितांची हत्या इतरांच्या कार्यकाळात झाल्या असा खोटा प्रचार केला. आधीही भाजपच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेल्या सरकारच्या काळात पंडितांच्या हत्या झाल्या” अशा सिनेमातून खोटा प्रचार करून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचे पवार म्हणाले.
आताचे महाविकास आघाडी सरकार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ” महाविकास आघाडीचा प्रयोग बाळासाहेब ठाकरे यांना आवडला असता. जेंव्हा राजकीय क्रायसिस निर्माण होतो, त्यावेळेला बाळासाहेब असते तर त्यांनी काय केले असते हा विचार डोक्यात येतो. आणि जो क्रायसिस निर्माण झाला आहे, त्याचे उत्तर सापडते”
ईडीच्या कारवाईचा त्रास कशासाठी करायचा ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद आणि संजय राऊत यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीच्या धाडी पडतात. भाजप नेत्यांवर ईडीच्या कारवाया होत नाहीत असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत म्हणाले, “ईडीच्या कारवाईचा ससेमिरा लागणार आहे म्हणल्यावर त्रास कशाला करुन घ्यायचा ? आता माझ्या सारख्या माणसाची नसलेली संपत्ती जप्त केली. मी ज्या घरात राहतो ते घर आणि वडिलोपार्जित घर असलेली संपत्ती नोटीस न देता जप्त केली. माझ्या जवळच्या लोकांवर ज्यावेळी धाडी पडल्या त्या रात्री आपण दिल्लीत होतो. धाडीच्या दिवशी रात्री बारा वाजता आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला. त्यांना सांगितलं, मी दिल्लीत आहे. अटक करा. मी घाबरत नाही, माझ्यासाठी गरिबांना त्रास देऊ नका”
ईडी-आयटीच्या धाडी फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांवर का पडतात, भाजपवर का पडत नाही ? या प्रश्नावर संजय राऊत यांनी 2024 नंतर त्याचं उत्तर देऊ. आमचेही दिवस येतील. लोकशाही आहे. समोर लोक बसले आहेत. 2024 मध्ये त्याचं उत्तर मिळेल, असं उत्तर संजय राऊतांनी दिलं.
तुमचा अडीच वर्षांचा आग्रह भाजपाने मान्य केला असता, तर एवढ्या अडीच वर्ष संपली असती. आता तुमची पुढील अडीच वर्षे सुरू झाली आहेत, आता कसं वाटतं आहे? यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “अडीच वर्षांपूर्वी साधारण आमची जी देवाणघेवाण सुरू होती. तेव्हाच माझ्या डोक्यात सुरू होतं की हे काही शब्दाला जागणारे लोक नाहीत. मी शरद पवारांशी नेहमी संपर्कात असतो, त्यांना म्हणालो की काहीतरी बदल महाराष्ट्रात व्हायला हवा. महाराष्ट्रात बदल करण्याचं सामर्थ जर कोणामध्ये असेल तर ते शरद पवार यांच्यात आहे. या गोष्टी निकालाच्या अगोदरच्या मी सांगतोय, याचा अर्थ भाजपाला आम्ही फसवायला निघालो होतो असं नाही. परंतु त्यांची जी वृत्ती होती, याचा मी एक फार मोठा अभ्यासक आहे. त्यामुळे मला माहीत आहे की हे काय करू शकतात, हे काय करणार हे मी आताही सांगू शकतो. दिलेला शब्द पाळला नाही म्हणून शिवसेना देखील या महाराष्ट्रात एक वेगळी भूमिका घेऊ शकते आणि शिवसेनेसोबत इतर प्रमुख पक्ष येऊन या राज्याला एक वेगळी दिशा आणि नेतृत्व देऊ शकतात, हे जेव्हा दाखवण्याची संधी आली. तेव्हा मला असं वाटतं की सगळ्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला ”