पुणे- मागील काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात बंदिस्त ठिकाणी मास्कसक्ती करण्यात आली आहे.अशा आशयाचे पत्र व्हायरल झाल्यामुळे राज्यात मास्क सक्ती करण्यात आल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. मात्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मास्कसक्ती लागू करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात एक सूचना पत्र देखील व्हायरल होत असून त्यावरून राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती लागू करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. महाराष्ट्रात बंदिस्त ठिकाणी मास्क सक्ती करण्याचं आरोग्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
परंतु आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वेगळेच स्पष्टीकरण दिले आहे. मास्कसक्तीविषयी चर्चा सुरू असली, तरी राज्यात मास्कसक्ती नसल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. “मुंबई, पुणे, पालघर आणि रायगडचा काही भाग, ठाणे या भागात थोडीफार संख्या वाढत आहे. त्याला अनुसरून देशाच्या केंद्रीय आरोग्य विभागाच्या लोकांनी पत्र पाठवलं आहे की या विभागांसाठी तुम्हाला रुग्णसंख्या वाढ रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. त्या बाबतीत परवा टास्क फोर्सच्या बैठकीत स्पष्टपणे ठरलं की जिथे गर्दीची ठिकाणं आहेत, तिथे मास्क वापरण्याचं आवाहन करावं. ते सक्तीचं नाही”, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.
राजेश टोपे यांनी मात्र माध्यमांशी बोलताना कोरोना मास्क वापरण्याबद्दल ‘मस्ट’ शब्द वापरला असला तरी त्याचा अर्थ ‘बंधनकारक’ असा नाही, असं म्हणत आरोग्य सचिवांच्या आदेशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मात्र यावरुन प्रशासन आणि मंत्री यांच्यात मात्र समन्वय नसल्याचं समोर आलं आहे.