औरंगाबाद- औरंगाबादच्या नामांतराची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. अद्याप या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. मात्र आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या नामांतरणाबाबत मोठं विधान केलं आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांच्या नामांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्यात आले आहे. ही नावे कधीही घोषित केली जातील असे विधान चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.
“शिवसेनेने 1988 साली महापालिका जिंकल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शहरात विजय मेळावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी हेच सांगितले होते. की, औरंग्या कशाला पाहिजे? त्याने आपल्या हिंदू धर्मियांना खूप त्रास दिला. मंदिरं तोडली, संभाजी महाराजांना किती त्रास दिला? अशा माणसाचं नाव कशाला ठेवायचं ? म्हणून या शहराचं नाव मी संभाजीनगर ठेवतो. तेव्हापासून आम्ही संभाजीनगर म्हणतो. संभाजीनगरचं नामांतरण आम्ही मंत्री असताना झालेलंच होतं. आता याबाबतीत उद्धव ठाकरे पूर्णपणे कायशीर प्रक्रिया पूर्ण करतील. ही कायदेशीर प्रक्रिया पूर्णपणे झालेलीच आहे”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.
आता चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या वक्तव्यावरून नामांतराचा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. कारण या नामांतराला काँग्रेसचा विरोध आहे. यावरून महाविकास आघाडीमध्ये अनेकदा वादही झालेला आहे. या नामांतराला एमआयएमचा देखील विरोध आहे.