वधू वराचे लग्न होते ही तर सामान्य गोष्ट आहे. यापूर्वी दोन मुलींनी एकमेकांशी लग्न केल्याची बातमी देखील तुम्ही वाचली असेल. पण आता एक मुलगी लग्न करणार आहे. तुम्ही म्हणाला ‘यात काय विशेष ?’ ही मुलगी लग्न करणार पण तरुणाशी नाही तर स्वतःशीच. जाणून घ्या या लग्नाची अजब कहाणी.
गुजरातमधील 24 वर्षांची क्षमा बिंदु 11 जून रोजी स्वत:सोबत लग्न करणार आहे. क्षमानं आपल्या लग्नासाठी लहंगा, सोने खरेदी केलं आहे, पार्लर देखील बुक केलं आहे आणि आता ती नवरी होण्यासाठी सज्ज आहे. मात्र इथं कुठलाही नवरदेव असणार नाही. गुजरातमध्ये पहिल्यांदाच असा आत्मविवाह होत आहे. क्षमाच्या या निर्णयाची चर्चा सर्वत्र होत आहे. म्हणजे नववधूच्या पोशाखातील क्षमा आता वरमाला स्वतःच्याच गळ्यात टाकणार
क्षमानं आपल्या लग्नासाठी गोत्रीमधील एक मंदिर निवडलं आहे. या मंदिरात ती स्वत:सोबत लग्न करणार आहे. लग्नात म्हणण्यासाठी तिनं स्वत:साठी पाच शपथा लिहिल्या आहेत. विशेष बाब अशी की, लग्नानंतर क्षमा हनिमूनला देखील जाणार आहे. ती गोव्याला हनिमूनला जाणार आहे, जिथं ती दोन आठवडे राहणार आहे.
या निर्णयाबाबत बोलताना क्षमानं सांगितलं की, मला कधीच लग्न करायचं नव्हतं. मात्र मला नवरी बनायचं होतं. त्यामुळं मी स्वत:शीच लग्न करायचा निर्णय घेतला. तिनं यासाठी परदेशात कुठं असं लग्न कुणी केलंय का? याचा शोध देखील घेतला. मात्र तिला तसं कुणी आढळून आलं नाही. तिनं म्हटलं की, कदाचित मी आपल्या देशातील पहिली व्यक्ती आहे जिनं आत्म प्रेमाचं एक वेगळं उदाहरण दिलं आहे.
क्षमा एका खासगी कंपनीत नोकरी करते. तिनं म्हटलं की, स्व-विवाह विनाशर्त स्वत:वर प्रेम करण्याचं एक मानक असेल. हे आत्म-स्वीकृतीचं एक काम आहे. लोकं अशा व्यक्तिसोबत लग्न करतात जिच्यावर ते प्रेम करतात. मी स्वत:वर प्रेम करते आणि म्हणूनच मी स्वत:सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. क्षमाच्या या निर्णयाला तिच्या आईवडिलांनी मान्यता दिली आहे. त्यांनी मला या लग्नासाठी आशीर्वाद देखील दिले आहेत, असे क्षमा बिंदू हिने सांगितले.