आनंदाची बातमी ! केरळमध्ये मान्सूनचे आगमन, हवामान विभागाची माहिती

524 0

मुंबई – मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या नागरिकांना आनंदाची बातमी म्हणजे, केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. यावर्षी वेळेआधीचं मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळं देशातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. लवकरच तो तळ कोकणाकडे दाखल होऊ शकतो.

हवामान विभागानं यंदा मान्सून वेळे अगोदर केरळमध्ये दाखल होईल, असं म्हटलं होतं. त्याप्रमाणं मान्सून आज केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील सहा ते सात दिवसांमध्ये म्हणजे 4 ते 5 जूनपर्यंत तळकोकणात आणि महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनच्या आगमनाचे सर्व निकष पूर्ण झाले असून केरळमधील 60 टक्के पर्जन्यमापक केंद्रांवर पावसाची नोंद झाली आहे.

केरळमधये आज मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील वेग मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढील दोन आठवडे मान्सूचा वेग कमी राहू शकतो, असं देखील हवामान विभागानं सांगितलं आहे. मान्सून आगमन जाहीर करताना भारतीय हवामान विभागाचे काही निकष असतात. ते निकष पूर्ण झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. केरळमध्ये बऱ्यापैकी सर्वत्र पाऊस झाल्यानं मान्सूनचे आगमन झाल्याचे हवामान विभागानं जाहीर केल्याची माहिती हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी दिली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये केरळच्या उत्तरेकडे परिस्थिती अनुकूल नाही. सध्या वाऱ्यांची दिशा वायव्येकडून आहे. ती नैऋत्येकडून असणे गरजेचे आहे. त्यामुळे लगेच मोठ्या पावसाची अपेक्षा ठेवणं योग्य ठरणार नसल्याचे प्रभुणे यांनी सांगितलं.

आज सकाळी सकाळी साडेआठ वाजता केरळ राज्यातील अनेक भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे. सध्या आकाश अंशतः ढगाळ असल्याची माहिती हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide