राज्यामागे लागलेला ‘शनी’ दूर करण्यासाठी हनुमान चालिसा पठण, राणा दांपत्याचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

320 0

नागपूर- काही दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी दिला होता. त्यानंतर मुंबईत जोरदार राडा झाला. या प्रकरणात राणा दांपत्याला अटक झाली. जामिनावर सुटका होताच त्यांनी दिल्ली गाठून संसदीय समितीकडे तक्रार केली. आज दिल्ली दौऱ्यानंतर राणा दांपत्य महाराष्ट्रात दाखल झाले आहे. नागपूर विमानतळावर दाखल होताच राणा दांपत्याने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

“महाराष्ट्राचं संकट दूर व्हावं यासाठी सगळ्यांनी आराधना करायला हवी. महाराष्ट्राला लागलेला शनी लवकरात लवकर दूर व्हायला हवा”, असं नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हटले. मंदिरात हनुमान चालीसा पठण करणार म्हटल्यावर आम्हाला नागपूर विमानतळावर अडवण्यात आल्याचा दावा खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. ‘आम्ही 36 दिवसांनी परतलो आहोत. महाराष्ट्रात हनुमान चालिसा बोलण्यास इतका विरोध का होत आहे? दिल्लीत आम्ही हनुमान चालिसा पठण केलं, रॅली काढली त्यावेळी तिथे सुरक्षा व्यवस्था होती. इथे महाराष्ट्रात रामाचा विरोध, हनुमान चालिसाला इतका विरोध का होत आहे. आज शनिवार आहे. महाराष्ट्राला लागलेला शनी दूर झाली पाहिजे आणि त्यासाठी आज आम्ही हनुमान चालिसा पठण करत आहोत’ असे नवनीत राणा म्हणाल्या.

रवी राणा यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर टीका केली. “ही सगळी नेहमीची प्रक्रिया आहे. आम्ही जिथे जिथे पोहोचतो, तिथे मुख्यमंत्री पूर्ण ताकद लावतात. आम्ही महाराष्ट्रात पाय ठेवताच मुख्यमंत्र्यांची झोप उडते. आम्हाला परवानगी नाकारणे, ताब्यात घेणे असे प्रकार सुरू आहेत. हा सगळा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अहंकार आहे. राज्याची जनता हे पाहात आहे. हनुमानाचं नाव घेणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं जातंय. मुख्यमंत्र्यांमध्ये आलेला हा अहंकार मोडून काढण्याचं काम राज्यातील हनुमान भक्त करतील”, असं रवी राणा म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!