पुणे- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी समाचार घेतला आहे. रूपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर ट्विटच्या माध्यामातून टीका केली आहे.
भाजपकडून ओबीसी आरक्षणासंदर्भात पु्ण्यात मोर्चा काढण्यात आला होता. यात चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. ‘तुम्ही राजकारणात कश्यासाठी राहत आहात. घरी जा, स्वयंपाक करा…’, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवाय मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रोटोकॉलही समजावला. ते म्हणाले, ‘तुम्ही खासदार आहात ना, मुख्यमंत्र्यांची भेट कशी घेतात, हे तुम्हाला माहित नाही? शिष्टमंडळ पाठवायचं असतं एवढंही माहित नाही. आता तुम्ही घरी जाण्याची वेळ आली आहे.’ त्यापुढे ते म्हणाले, ‘आम्ही दिल्लीत जा, नाही तर मसनात जा… पण आरक्षण द्या!’
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी कठोर शब्दात टीका केली आहे. रुपाली पाटील म्हणाल्या, “स्वयंपाक घरात असणारी महिला अन्नपूर्णा देवी असते. मसनात असणारी महाकाली असते, ती महाकाली तुमच्यासारख्या राक्षसाच्या वृत्तीचे मुंडके छाटल्याशिवाय शांत होत नसते’, अश्या शब्दात रूपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर हल्ला चढवलाय. याशिवाय त्यांनी ‘बेताल ,सत्तापिपासू चंपा!” असं म्हणत चंद्रकांत पाटलांना उत्तर दिलं आहे.
स्वयंपाक घरात असणारी महिला अन्नपूर्णा देवी असते.
मसनात असणारी महाकाली असते,
ती तुमच्यासारख्या राक्षसाच्या वृत्तीचे मुंडके छाटल्या शिवाय शांत होत नसते .
बेताल ,सत्तापिपासू चंपा.@abpmajhatv @zee24taasnews @SakalMediaNews @TV9Marathi @LoksattaLive @NCPspeaks— Rupali patil thombare (@Rupalispeak) May 25, 2022
चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात बॅनरबाजी
चंद्रकांत पाटील यांनी काल सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आक्रमक झाली आहे. पुण्यातील पाषाण भागात चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने खास पुणेरी बॅनर लावत निषेध नोंदविला आहे. ‘एका महिलेचा मतदार संघ चोरून आमदार झालेल्या माणसाकडून अजून काय अपेक्षा करणार…’ असा बॅनर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने लावण्यात आला आहे. या बॅनरवर ‘चंपावाणी’ असा हॅशटॅग सुद्धा वापरण्यात आला आहे.