अभिनेत्री मुक्ता बर्वे प्रमुख भूमिकेत असलेला ‘वाय’ (Y) चित्रपट सध्या चर्चेत आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू असून अनेक कलाकार, प्रेक्षक आणि अनेक मान्यवर मंडळी हातामध्ये ‘वाय’ अक्षर लिहीलेले पोस्टर घेऊन चित्रपटाला पाठिंबा देत आहेत.
या चित्रपटात मुक्ता बर्वे प्रमुख भूमिकेत असून अन्य कलाकारांची नावे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहेत. कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा अजित सुर्यकांत वाडीकर यांची असून पटकथा आणि संवाद अजित वाडीकर,स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत. दिग्दर्शन अजित सुर्यकांत वाडीकर यांनी केले आहे. तर कार्यकारी निर्मात्याची धुरा विराज विनय मुनोत यांनी सांभाळली आहे.
नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर लाॅंच करण्यात आले. यामध्ये मुक्ता बर्वे एका आक्रमक अंदाजात हातात मशाल घेऊन लढताना दिसत आहे. तिचा हा लढा नेमका कोणासाठी आणि का आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहेत. हा चित्रपट २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अजित सुर्यकांत वाडीकर म्हणतात, ‘’या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सुरू केलेल्या उपक्रमाला मान्यवर कलाकार, विविध क्षेत्रातील दिग्गज तसेच सर्वसामान्यांनीही पाठिंबा दिला आहे. अगदी राजकीय नेतेही त्यात मागे नाहीत. खुर्चीला खिळवून ठेवतानाच प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा हा थरारपट मराठीतील पहिलाच हायपरलिंक चित्रपट असेल. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ‘ हायपरलिंक ‘ हा मराठी चित्रपटाचा नवीन आकृतिबंध प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.’’