मुंबई- अभिनेता सोनू सूद याने कोरोनाच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांसाठी मदतीचा हात पोहोचवला. सोनू सूद नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना मदतीचा हात देत आलेला आहे. अलीकडेच बिहारच्या एका चिमुरडीला त्याने मदत केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून त्याने या मुलीला मदतीचा हात दिला आहे.
बिहारमधील एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला होता. एका दुर्घटनेमध्ये पाय गमावल्याने एक मुलगी एका पायावर चालत शाळेत निघाली आहे. या मुलीचे नाव सीमा असून ती अवघ्या 10 वर्षांची आहे. ही मुलगी बिहारच्या जमुई जिल्ह्यातील असून तिने रस्ते अपघातात एक पाय गमावला होता. पण यामुळे तिची शाळेत जाण्याची जिद्द कमी झाली नाही. ती एका पायावर शाळा गाठते आणि अभ्यास करते आहे. हा व्हिडिओ पाहून अभिनेता सोनू सूद तिला मदत करणार आहे. याविषयी त्याने ट्वीट करुन माहिती दिली आहे.
सोनू सूदने असं ट्वीट केलं आहे की, ‘आता ही तिच्या एक नाही तर दोन्ही पायांवर शाळेत जाईल. तिकिट पाठवत आहे. चला आता दोन्ही पायावर चालण्याची वेळ आली आहे.’
सोनू सूदने दिलेल्या आश्वासनानुसार ती लवकरच दोन्ही पायावर उभी राहण्याची शक्यता आहे.