Astavakrasana

Astavakrasana : अष्टवक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

834 0

अष्टवक्रासन (Astavakrasana) म्हणजेच आठ कोन असणारे किंवा आठ जागेत शरीराला वाकवणारे आसन. हे आसन अष्टवक्र नावाच्या महर्षींना समर्पित आहे.

अष्टावक्रासनाची कृती
आसनपूर्व स्थितीसाठी दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून दोन्ही हात दोन्ही मांड्यांजवळ ठेवून आरामात उभे रहावे.

अष्टवक्रासन करण्यासाठी दोन्ही पायांमध्ये 3 ते 4 फुटांचे अंतर ठेवावे.

आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवून उजवा हात जमिनीवर अशा प्रकारे ठेवावा की उजवा हात दोन्ही पायांच्या मधोमध येईल आणि डावा हात डाव्या पायाच्या बाजूला जमिनीवर बाहेरील दिशेने असेल.

आता उजवा पाय उजव्या हाताच्या बाहुवर अशाप्रकारे ठेवावा की उजव्या पायाची मांडी कोपराच्या वर असेल आणि उजवा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या हाताच्या कोपराच्या वरील बाजूस अडकवला जाईल.

आता डावा पाय सावकाश पुढे आणत उजव्या बाजूस आणावा.

सावकाश दोन्ही पाय जमिनीपासून वर उचलत डावा पाय उजव्या पायाच्या वर अशाप्रकारे ठेवावा की डाव्या पायाचे पाऊल उजव्या पायाच्या पावलामध्ये अडकविले जाईल.

आता दोन्ही पाय उजव्या बाजूला गुडघ्यामध्ये सरळ करावेत. उजवा हात कोपरामध्ये थोडासा वाकलेला असेल. डावा हात कोपरात सरळ असेल.

शरीर दोन्ही हातांवर तोलले जाईल. आता डोके आणि शरीर जमिनीकडे समांतर रेषेत न्यावे.

यासाठी दोन्ही हात कोपरात वाकवले जातील आणि डोके अंतिम स्थितीमध्ये उजव्या किंवा डाव्या बाजूस वळवले जाऊ शकेल.

अंतिम स्थितीत अष्टवक्रासन आपल्या क्षमतेनुसार स्थिर ठेवावे आणि प्राणधारणेचा अभ्यास करावा म्हणजेच श्वासावर लक्ष केंद्रित करावे.

याच पद्धतीने अष्टवक्रासनाचा अभ्यास डाव्या पायाच्या बाजूनेही करावा.

अष्टावक्रासनाचे फायदे
आसन हे पूर्णपणे दोन्ही हातांवर तोलले असले तरीही ओटीपोटाच्या स्नायूंचा प्रामुख्याने सहभाग आहे.

त्यामुळे ओटीपोटातील स्नायू मजबूत होतात. खांदे, मनगट, बाहु मजबूत होण्यास मदत होते.

पाय, मांड्या, घोटे, गुडघे यांचा व्यायाम होऊन स्नायूंना बळकटी मिळते.

मेरुदंडाचा लवचिकपणा वाढतो. श्वसनसंस्था, पचनसंस्थेचे कार्य सुधारते. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते.

हे तोलासन प्रकारतील आसन असल्यामुळे शरीर व मनाची एकाग्रता होऊन मानसिक स्वास्थ लाभते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!